मोदींची केंद्राच्या परराष्ट्र धोरणावर टीका

त्रिची – भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत त्रिची येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेळाव्यासमोर भाषण करताना केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर कडक टीका केली. पाकिस्तानशी नमते धोरण घेणार्‍या या कॉंग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले.

अमेरिकेत एडवर्ड स्नोडेन या पत्रकाराने अमेरिकेच्या गुप्तचर खात्यातील कागदपत्रे फोडली आणि तो रशियात पळून गेला. परंतु अमेरिकेच्या अध्यक्षांनी रशियाला ठणकावून सांगितले आणि स्नोडेनला आश्रय दिल्यास गंभीर परिणाम होतील याची जाणीव रशियाच्या अध्यक्षांना करून दिली. त्याचे उदाहरण देऊन नरेंद्र मोदी यांनी भारत सरकार पाकिस्तानशी अशा खंबीरपणाने वागत नाही त्याबद्दल खेद व्यक्त केला.

पाकिस्तानचे अतिरेकी भारतावर हल्ले करतात आणि भारताचे पंतप्रधान पाकिस्तानच्या अध्यक्षांची भेट घेतात ही गोष्ट भारताच्या दुबळेपणाचे द्योतक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात तामिळनाडू आणि गुजरात या दोन राज्यातील बर्‍याच साम्यांचा उल्लेख केला.