मोदीच्या सभेला राहणार रजनीकांत उपस्थित

तिरुचिरापल्ली: गेल्या काही दिवसांपासून भाजप दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतला जवळ करीत असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींची गुरूवारी दक्षिण भारतात पहिली सभा होणार आहे. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीत आज मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी दक्षिणेचे प्रसिद्ध अभिनेते रजनीकांतदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तमिळनाडूत भाजपने विजयासाठी रजनीकांतची मदत घेण्याचे ठरविल्याचे उघड होत आहे.

तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीत आज होणा-या सभेस ‘यूथ कॉन्फ्ररन्स’ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान या सभेसाठी दक्षिणेचे प्रसिद्ध अभिनेते रजनीकांतदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सभेच्या ठिकाणी व शहरात सर्वत्र नरेंद्र मोदी आणि रजनीकांत यांचे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत रजनीकांत यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. त्यामुळे या सभेस तो उपस्थित राहणार की नाही याबाबत समजू शकले नाही.

त्याचबरोबर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी यांची गुरुवारी केरळातील कोल्लममध्येही एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या तमिळनाडू येथील सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मोदी आणि रजनीकांत जर एकत्र आले तर आगामी काळात तमिळनाडूतील सत्ता समिकरणे बदलणार आहेत.