केनयात ४० भारतीय मारले गेले असल्याची भीती

नैरोबी – केनयाची राजधानी नैरोबी येथील एका मॉलवर सोमालियातील अल शबाब या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात सात भारतीय मारले गेले असल्याचे सांगितले जात असले तरी हा आकडा यापेक्षा मोठा आहे आणि किमान ४० भारतीय या हल्ल्यात ठार झाले असल्याची भीती केनयात स्थायिक झालेल्या काही भारतीयांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यानंतर बचाव कार्यासाठी मॉलमध्ये गेलेले बांधकाम कंत्राटदार रवि वखारिया यांनी बरेच भारतीय मेले असल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला.

या हल्ल्यामध्ये एकूण ७० लोक मारले गेले असल्याचे आतापर्यंत जाहीर झाले आहे. परंतु आपण मदत कार्यासाठी आत गेलो तेव्हा पहिल्या काही मिनिटातच आपल्याला १०० मृतदेह आढळले, असे वखारिया म्हणाले. सात भारतीय मारले गेले असल्याचे म्हटले गेले असले तरी अजूनही बर्‍याच भारतीयांचा शोध लागत नाही आणि ते मारले गेले असतील तर मेलेल्या भारतीयांची संख्या ४० च्या आसपास जाऊ शकते असे ते म्हणाले.

या दहशतवादी हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या भारतीयांमध्ये गुजराती लोकांची संख्या जास्त आहे. कारण व्यापारासाठी केनयामध्ये जाण्याची गुजराती समाजात मोठी परंपरा आहे. यातील काही लोकांनी या मॉलच्या शेजारीच ओसवाल कम्युनिटी हॉल बांधलेला होता आणि या हॉलमध्ये काही कार्यक्रम सुरू असताना हा हल्ला झाला.