इथेही पाकिस्तानच

काल पाकिस्तानने प्रोत्साहित केलेले तीन भीषण हल्ले जवळपास ३०० लोकांचे प्राण घेऊन गेले. या तीन हल्ल्यांमागे अमेरिकाद्वेेष आहे. ख्रिश्‍चन द्वेष आहे आणि इस्लाममधल्याच शिया मुस्लिमांचाही द्वेष आहे. अर्थात जगातली कोणतीही दहशतवादी शक्ती कोणाला तरी शत्र? ठरवून आणि त्यांचा खातमा करण्याची प्रतिज्ञा करूनच फोफावलेली असते. कोणी ख्रिश्‍चनांना आपला शत्रू ठरवलेला तर कोणी आपल्याच धर्मातल्या शिया पंथीयांना दुष्मन ठरवून त्यांच्यावर हल्ले करीत आहे. या तीन घटनांच्या परिणामांची व्याप्ती मोठी आहे आणि त्यांचे परिणाम जगभर जाणवणार आहेत. या घटनांनी आज जगातल्या हिंेसाचाराने आशिया खंडाचा विशेषत: पश्‍चिम भाग आणि आफ्रिकेतले काही देश कसे होरपळून निघत आहेत हे दाखवून दिले आहे. तीन देशांत एकाच वेळी तीन दहशतवादी हल्ले झाले आहेत. पहिला मोठा केनयातला हल्ला हा एकदमच अनपेक्षित आहे. सोमालिया मधील काही संघटनांनी राजधानी नैरोबीतल्या एका मॉलवर हल्ला केला. या घटनेचा थरार अजूनही जारी आहे. पण या मॉलमध्ये शस्त्रधारी अतिरेकी घुसल्याने त्यांना हुसकावून लावण्यासाठी जवान पाठवण्यात आले आहेत आणि तिथली कारवाई ही युद्धसदृश्य झाली आहे.

हा प्रकार मोठा गंभीर आहे कारण या हल्ल्यासाठी अल शबाब या अतिरेकी संघटनेने अशा मॉलची निवड केली आहे की, ज्याच्यावर हल्ला करण्याने अधिकाधिक परदेशी नागरिक मारले जातील. या प्रकाराने या घटनेचे पडसाद सार्‍या जगात उमटणार आहेत. या हल्ल्यात काही भारतीयही ठार वा जखमी झाले आहेत आणि त्यामुळे हा हल्ला आपल्यासाठीही चिंतेचा झाला आहे. अल शबाब या संघटनेला पाकिस्तानची फूस आणि मदत आहे. पाकिस्तान हा देश दहशतवादी कारवायांमध्ये भस्मासुरा सारखा भस्म होणार आहे. कारण या देशाने आता दहशतवादी कारवाया हा आपला धंदाच केला आहे. मोठ्या शहरांत भाडोत्री मारेकरी असतात आणि ते काही पैशाची सुपारी घेऊन ती देणार्‍याच्या इशार्‍यानुसार कोणाचाही गेम करतात असे पाकिस्तानचे नेते आणि अधिकारी जगात कोठेही सुपार्‍या घ्यायला लागले आहेत. कालच्या तीन हल्ल्यातला दुसरा गंभीर हल्ला पाकिस्तानातच झाला आहे. पाकिस्तानात गैरमुस्लिमांना सुखाने जगू दिले जात नाही. तिथल्या हिंदूंची काय अवस्था आहे हे जगाला माहीत झाले आहेच. तिथे ख्रिश्‍चनांनाही त्रस्त केले जाते. काल अल कायदाची फूस असलेल्या काही अतिरेक्यांनी एका चर्चवर हल्ला करून ख्रिश्‍चनांना लक्ष्य करीत तब्बल ७८ जणांना ठार केले.

मागे जनरल मुशर्रफ यांना धमकी देताना पाकिस्तानातल्या काही दहशतवाद्यांनी इस्लामच्या विरोधकांना खलास करण्यासाठी पाचशे मानवी बॉंब तयार असल्याचे म्हटले होते. अर्थात त्या वेळी त्यांनी मुशर्रफ यांनाही इस्लाम के दुष्मन ठरवलेले होते. आता याच मानवी बॉंबचा अतीशय क्रुरपणे वापर करून त्यांनी पेशावरच्या चर्चमध्ये दोन मानवी बॉंबचे स्फोट घडवले. आपल्या धर्मासाठी स्वत:ला संपवून टाकण्यास हे मानवी बॉंब तयार कसे होतात हे नवलच आहे. त्यांच्या डोक्यात धर्मवेड भरवून त्याना ब्रेनवॉश केले जाते. ते करणारांची क्षमता वाईट अर्थाने पण अफाटच म्हटली पाहिजे. कारण त्यांचे पराकोटीचा म्हणजे आपल्या शरीराचा त्याग करण्याचे तत्त्वज्ञान चुकीचे आहे. त्यांना खरा धर्म म्हणजे काय हे कळलेलेच नाही पण समजलेल्या चुकीच्या धर्मासाठी ते असे बलीदान करायलाही तयार असतात. या घटनेत ख्रिश्‍चनांची हत्या झाली असल्याने तिचेही पडसाद जगभरात उमटणार आहेत. दोन दिवसांपूर्वी अल कायदाच्या प्रमुखाने एका मुलाखतीत आपल्या अनुयायांना गैर मुस्लिमांना फार त्रास न देण्याचा आदेेश दिला होता. त्याच्या या आदेशातून हिंदूंना त्रास न देण्याची सूचना पुढे आली होती. मात्र त्याने शिया आणि ख्रिश्‍चनांना लक्ष्य करण्याचे सूचित केले होते. आज जगातल्या अनेक देशांत अमेरिका दहशतवाद्यांना मदत करीत आहे. सीरियात याचा अनुभव आलाच आहे.

त्यामुळे मुस्लिम जगतात आणि त्यातल्या कट्टर मुस्लिमांत अमेरिकेच्या विरोधात तीव्र संताप आहे. यातून निर्माण झालेल्या संघर्षाला मुस्लिम विरुद्ध खिश्‍चॅनिटी असा रंग आला आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तानात अनेक खिश्‍चनांना मारले गेले आहे. धर्मविरोधी कृत्याचा आळ घेऊन त्यांना शिक्षा केल्या गेल्या आहेत. आता त्यांनी मोठ्या प्रमाणावर हा हल्ला करून आपला खिश्‍चनविरोधी अजेंडा जागतिक केला आहे. हा हल्ला जागतिक होणार कारण अमेरिकेने या घटनेनंतर ड्रोन क्षेपणास्त्राचा हल्ला करून या पाक अतिरेक्यांना उत्तर दिले आहे. इराकमध्ये घडलेल्या तिसर्‍या हल्ल्यात सुनी मुस्लिमांनी शिया मुस्लिमांना लक्ष्य करीत त्यांच्या अंत्ययात्रेवर हल्ला केला असून तब्बल ९६ जणांना मारले आहे. आपण सुनी मुस्लिम आणि शिया मुस्लिम असे शब्द प्रयोग करतो पण सुनी मुस्लिम शिया मुस्लिमांना मुस्लिम मानायला तयार नाहीत आणि त्यांना जगण्याचा हक्कही द्यायला तयार नाहीत. त्यातून हे शियांचे शिरकाण होत आहे. ते बगदादमध्ये होत आहे तसेच ते इराकमध्येही होत आहे. पाकिस्तानातही हा प्रकार सुरू आहे.