मुंबई बलात्कारप्रकरणी आज आरोप निश्चिती

मुंबई- महिला फोटोग्राफरवर शक्ती मिल कंपाऊंडमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी सोमवारी आरोप निश्चित केले जाणार आहेत. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने १४ सप्टेंबरला आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्या पाच आरोपींवर कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतल्या महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिलमध्ये महिला पत्रकारावर पाच नराधमांनी २२ ऑगस्ट रोजी बलात्कार केला होता. त्याला एक महिना पूर्ण होण्याच्या आधीच मुंबई क्राईम ब्रॅचने या प्रकरणी आरोप पत्र दाखल केले आहे. दाखल करण्यात आलेले हे आरोपपत्र जवळपास ६०० पानांचे असून एकूण ८२ लोकांची यामध्ये साक्ष नोंदवण्यात आली आहे.

फोटो जर्नलिस्ट आणि तिच्या मित्राने ४५ मिनिटात शक्तीमील कम्पाऊंडचे २४० फोटो काढले होते. त्यावरुन हे दोघे ऑफिसच्या कामासाठीच शक्तीमील कम्पाऊंडमध्ये आले होते. घटनास्थळी मिळालेले कपड़े, आरोपींचे कपड़े आणि फ़ोटो जर्नलिस्टचे कपड़े, त्यांचा डीएनए रिपोर्ट, फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट, फ़ोटो जर्नलिस्टने मॅजिस्ट्रेट समोर दिलेला जबाब, फोटो जर्नलिस्टला जागा साफ करायला लावलेली ओढणी, ज्या काचेच्या तुकड्याने धमकावण्यात आले होते. त्या बीअरच्या बाटलीचा काचेचा तुकडा आणि घटनास्थळावरून मिळालेले पुरावे या आधारावर क्राईम ब्रँचने आरोपपत्र तयार केले आहे.