आगरतळा – त्रिपुरामध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम करणार्या कॉंग्रेस पक्षाला रविवारी मोठा फटका बसला. कॉंग्रेस पक्षाच्या ५०० कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचा त्याग करून तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यामध्ये तृणमूल कॉंग्रेसची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. या पक्षात कॉंग्रेसचे नेते गेल्यामुळे पश्चिम बंगालप्रमाणेच त्रिपुरामध्ये सुद्धा कॉंग्रेसपेक्षा तृणमूल कॉंग्रेस बलवान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
५०० कॉंग्रेसजन तृणमूलमध्ये दाखल
कॉंग्रेसचा त्याग करून तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची संख्या येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. त्रिपुरातला कॉंग्रेस पक्ष तिथल्या सत्ताधारी डाव्या आघाडीशी कार्यक्षमतेने संघर्ष करू शकत नाही, त्यामुळे आपण कॉंग्रेसचा त्याग करून तृणमूलमध्ये प्रवेश करत आहोत असे या नेत्यांनी सांगितले.
तृणमूलमध्ये प्रवेश करणार्या कॉंग्रेस नेत्यांत माजी मंत्री सूरजित दत्ता, रतन चक्रवर्ती आणि जवाहर साहा यांचा समावेश आहे. त्यांनी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली होती. या नेत्यांनी आता कॉंग्रेसच्या अन्य कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याकरिता राज्यव्यापी दौरा करण्याचे ठरवले आहे.
केंद्रातल्या कॉंग्रेस नेत्यांनी डाव्या आघाडीशी आतून सहकार्य करण्याची योजना आखलेली आहे आणि केंद्रात सत्तेवर येण्यासाठी कॉंग्रेसचे नेते कधीही डाव्या आघाडीची मदत घेऊ शकतात ही गोष्ट कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवडलेली नाही. असाच प्रकार पश्चिम बंगालमध्ये घडला होता.
