नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी कट कारस्थाने करत असून लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल केला. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी विद्यमान संपु आघाडी सरकारवर अकार्यक्षमतेचा आणि वाईट प्रशासन देण्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी हा पलटवार केला.
कॉंग्रेस पक्ष गेल्या नऊ वर्षात काय कामगिरी केली आहे याचा आढावा घेण्यापासून पलायन करत आहे असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र त्याला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी आपला पक्ष पलायन करणार नाही, अशी ग्वाही दिली. आपल्या सरकारने जनतेला माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगार हमी योजना दिलेली आहे आणि नुकताच अन्न सुरक्षा कायदाही मंजूर केला आहे, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी आपल्या सरकारची कामगिरी नोंदवली.
आपल्या सरकारने नुकताच भूमी अधिग्रहणाचा कायदा मंजूर केला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्या सरकारच्या या उपलब्धीकडे दुर्लक्ष करत असून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करत आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार या देशात होते. कॉंग्रेसने घेतलेले असे क्रांतीकारक निर्णय भाजपाचे सरकारने का घेतले नाहीत, त्यांनी कोणी अडवले होते असा सवालही सोनिया गांधी यांनी केला. राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यातील रुपाहेलिया या गावी एका विद्युत निर्मिती केंद्राच्या शिलान्यास समारंभात त्या बोलत होत्या.