मुंबई – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी शनिवारी 11 हजार 600 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी किला न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात एकूण 22 आरोपींची नावे आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे माजी सीईओ गुरुनाथ मयप्पन यातील महत्त्वाचे आरोपी असून विंदू दारासिंग, पाकिस्तानी पंच असद रौफ यांचाही यामध्ये समावेश आहे. तथापि, यात स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाचा उल्लेख न करता फसवणूक, सट्टेबाजी, कट रचणे आणि अफरातफर याचा आरोपपत्रात समावेश केला आहे.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी मयप्पन, विंदूवर आरोपपत्र दाखल
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केलेल्या 22 आरोपींपैकी 18 आरोपीच शनिवारी न्यायालयात हजर होते. त्यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन यांचा समावेश होता. मयप्पन विरोधात फोन कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांच्या फोनच्या सीम कार्डमधून दुसरे पुरावे मिळाले आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे, तर विंदू दारासिंग याच्यावर इन्फर्मेशन अॅक्ट आणि गॅम्बलिंग अॅक्टनुसार आरोपपत्र दाखल केले आहे.
या खटल्याची पुढची सुनावणी आता 21 नोव्हेंबरला होणार आहे. या अगोदर दिल्ली पोलिसांनी 30 जुलै 13 रोजी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील याच्यासह 39 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात दाऊद सट्ट्याचे रेट ठरवित होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे, तर राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू अजित चंडिला, अंकित चव्हाण आणि एस. श्रीसंत यांची नावेही या आरोपपत्रात आहेत.
दरम्यान, मागील आठवड्यात बीसीसीआयने श्रीशांत आणि अंकित चव्हाणवर आजीवन बंदी घातली आहे. याशिवाय पाकिस्तानी अंपायर असद रौफही पोलिसांच्या वॉण्टेड लिस्टमध्ये आहे. सध्या मयप्पन आणि विंदू दारासिंग जामिनावर सुटलेले आहेत.
