केनियात दहशतवादी हल्ला, दोन भारतीयांसह 43 ठार

नवी दिल्ली – केनियातील नैरोबी येथे एका मॉलवर दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्लात 43 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोघा भारतीयांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केलेले हे मॉल नैरोबीतील लोकप्रिय मॉल आहे. शनिवारी सुमारे एक हजार ग्राहक मॉलमध्ये होते. या दरम्यान काही हल्लेखोर मॉलमध्ये शिरले. 10 हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे स्थानिक तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

हल्लेखोरांनी यावेळी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 39 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये श्रीधर नटराजन (वय 40), परमाशू जैन या (वय 8) या दोघा भारतीयांचा समावेश आहे. नटराजन हे नैरोबीत औषध उत्पादन करणा-या कंपनीत कार्यरत होते. तर परमाशूचे वडील हे बॅँक ऑफ बडोदाच्या नैरोबीतील शाखेत शाखा प्रबंधक पदावर कार्यरत आहेत.

चार भारतीय या हल्ल्यात जखमी झाले असून यात दोन महिला, एक तरुणी व आणखी एका भारतीयाचा समावेश आहे. जखमी आणि मृत्यू झालेल्या भारतीयांच्या नातेवाईकांशी नैरोबीतील भारतीय दूतावासाने संपर्क साधला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल-कायदाचा प्रभाव असलेल्या सोमालियातील अल शबाब या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्याचा अमेरिकेसह जगभरातून निषेध करण्यात येत आहे.

हल्लेखोरांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. या हल्लेखोरांना ठार मारण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती मिळतीये. हल्लेखोरांनी हल्ला करताना हँडग्रेनेडचाही वापर केल्याची माहिती रेडक्रॉसच्या अधिकार्‍यांनी दिलीये. सोमालियातील दहशतवादी संघटना अल-शबाबने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.