मुंबई- मुलुंड येथील एका कचरावेचक महिलेवर ७ ते ८ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार मुलुंड पोलिस स्टेशनात दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून अन्य आरोपींची चौकशी करण्यात आली असून त्यांच्यात शोधासाठी युनिटच्या ७च्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार केली आहेत.
ही पीडित महिला मूळची नंदुरबारमध्ये राहणारी असून, काही महिन्यांपूर्वीपासून ती मुलूंड येथे कचरा वेचण्याचे काम करत होती. तिची दोन मुले आणि पती नंदुरबार येथेच राहतात. रात्री एका टेम्पोत झोपले असताना तीन तरुणांनी अपहरण करून मला निर्जनस्थळी नेले आणि बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
सांताक्रूझ येथील एका झोपडपट्टीत राहणा-या चार वर्षांच्या मुलीवर शेजा-यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघड झाली. याप्रकरणी संजय मोहिते (वय ३७) याला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सकाळी पीडीत मुलीचे वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. साडेदहा वाजण्याच्या सुमारास आई दूध आणण्यासाठी गेली. तेव्हा ही मुलगी घरात एकटीच झोपली होती. त्यावेळी घरात शिरलेल्या संजयने या मुलीवर अत्याचार केले. आई घरी परतल्यानंतर मुलीला रक्तस्त्राव होत असल्याचे दिसले. तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी चौकशीअंती शनिवारी मोहितेला अटक केली.