चँपियन्स लीगमध्ये चेन्नीईची आज टायटन्सशी लढत

रांची- चँपियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या साखळी सामन्यात रविवारी रांचीत चेन्नई सुपर किंग्ज विरूध्दग दक्षिण आफ्रिकेतील टायटन्सची लढत होणार आहे. अन्य एका लढतीत ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन हीटची गाठ त्रिनिदाद अँड टोबॅगोशी पडणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रांचीत होत असलेल्यात टायटन्सविरुद्धच्या सामन्यावत महेंद्रसिंग ढोणी आणि सहका-यांचे पारडे जड वाटते. आयपीएलच्या सहाव्या मोसमात आणखी एका जेतेपदाने हुलकावणी दिली तरी चेन्नईने सातत्य राखले. आयपीएलमधील सहापैकी पाच मोसमांत ‘फायनल’ गाठणा-या चेन्नईने २०१० मध्ये मायदेशात झालेली चँपियन्स लीगही जिंकली आहे. दोन्ही स्पर्धाच्या जेतेपदांसह टी-२० क्रिकेटसाठी अनुकूल क्रिकेटपटू आणि त्यांच्या गाठीला असलेला मोठा अनुभव ही माजी विजेत्यांसाठी जमेची बाब ठरू शकेल.

दुस-या सामन्या त ब्रिस्बेन हीट व त्रिनिदाद अँड टोबॅगोतील लढतीत दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. कॅरेबियन टी-२० विजेत्या त्रिनिदादला कीरॉन पोलार्ड, ड्वायेन ब्राव्हो आणि केवॉन कूपरची अनुपस्थिती जाणवेल. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (बीबीएल) विजेत्या ब्रिस्बेनची अवस्थाही तशीच आहे. बीबीएलमध्ये खेळलेल्या शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन, रायन हॅरिस आणि ल्युक पॉमर्सबॅच या ऑस्ट्रेलियन चौकडीसह न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू डॅनियर व्हेटोरी तसेच श्रीलंकेचा अष्टपैलू थिसरा परेराविना त्यांना यंदा खेळावे लागेल.

त्रिनिदादकडे टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघातील डॅरेन ब्राव्हो, कर्णधार दिनेश रामदिन, रवी रामपॉल आणि सुनील नारायण असे क्रिकेटपटू आहेत. डावखु-या ब्राव्होसह लेंडल सिमॉन्स आणि अड्रियन बराथवर त्यांची फलंदाजीची भिस्त आहे. गोलंदाजीत ऑफस्पिनर सुनील नारायण हा त्रिनिदादसाठी ‘ट्रंप कार्ड’ ठरू शकेल. त्रिनिदाद अँड टोबॅगोला यंदा महान क्रिकेटपटू ब्रायन लाराचे मार्गदर्शन मिळणार आहे.