लंडन – भारताचे योगगुरू रामदेवबाबा यांची लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सहा तास कसून चौकशी केल्याचे समजते. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ आठ तास ही चौकशी सुरू होती. चौकशी कशासाठी झाली याबाबत निरनिराळी कारणे दिली जात आहेत.
स्वामी विवेकानंद यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त लंडनमध्ये पतंजली योगपीठाद्वारा एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी रामदेवबाबा काल लंडन येथे पोहोचले. हिथ्रो विमानतळावर सीमा शुल्क अधिकार्यांनी त्यांना थांबविले. बिझिनेस व्हिसा ऐवजी रामदेवबाबा व्हिजिटर व्हिसावर आल्याने त्यांना थांबविले गेल्याचे कांही जण सांगत आहेत तर त्यांच्याबरोबर त्यांनी जी औषधे आणली होती त्यासंदर्भात त्यांची चौकशी झाल्याचे सांगितले जात आहे. रामदेवबाबांनी त्याच्यासोबत हिंदी, संस्कृत पुस्तके आणली आहेत व त्यामुळे त्यांना थांबविले गेले असेही सांगितले जात आहे.
रामदेवबाबांचे प्रवक्ते तेजारवाला यांनी मात्र बाबांबरोबर त्यांच्या सामानाव्यतिरिक्त अन्य कांहीच नव्हते असे सांगून चौकशीसाठी का थांबविले गेले याचे उत्तर ब्रिटनचे सीमा शुल्क अधिकारीच देऊ शकतील असे सांगितले आहे.