पणजी : आयात केलेल्या ओल्या (नव्या) कांद्याला ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे. वाळलेल्याु कांद्यापेक्षा ओल्या कांद्याचे दर २० रुपयांनी स्वस्त असल्याने ग्राहकांनी ओला कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.फलोत्पदनाच्या भाजी विक्री दालनांत नेहमीच्या सुक्या कांद्याबरोबरच आता ओला कांदा आणण्यास सुरुवात करण्या्त आली आहे.
वाळलेला कांदा महाराष्ट्रातून मागविला जात आहे. महाराष्ट्रात कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने कांद्याच्या खरेदीचे प्रमाण कमी होत चालल्याचे फलोत्पादन महामंडळाला दिसून आले. जेवणात कांदा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, कांद्याच्या भरमसाट दरामुळे सर्वसामान्यांना तो विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे कर्नाटकातून ओला कांदा मागविण्यात आला आहे. हा कांदा तीन ते चार दिवसांच्यावर राहत नाही; पण नियमित वापरण्यात येत असल्याने सुक्या कांद्याच्या तुलनेत या कांद्याची जास्त खरेदी होत आहे.
फलोत्पादन महामंडळाच्या भाजीविक्री दालनांवर सुका कांदा ६६ रुपये किलो, तर ओला कांदा ४६ रुपये किलो आहे. ग्रामीण भागात जाणार्याि मोबाईल व्हॅनवर ओल्या कांद्याचे दर ३७ रुपये किलो आहेत, असे फलोत्पादन विकास महामंडळाचे संचालक ऑर्लांडो रॉड्रिग्स यांनी सांगितले. १९ सप्टेंबरपासून भाजीविक्री केंद्रावर सुरू केलेल्या फळविक्रीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. पहिल्याच दिवशी एकूण ४0 दालनांवर २ टन फळे पुरविण्यात आली होती.