जयपूर: चॅम्पियन्स लीगच्या पाचव्या सीजनला आजपासून सुरुवात होत आहे. देश-विदेशातील ट्वेण्टी२० लीगमधील दहा सर्वोत्तम संघ या बॅटल ऑफ चॅम्पियन्समध्ये उतरणार आहेत. या स्पनर्धेचे बिगुल शनिवारी रात्री आठ वाजता मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमधल्या लढतीने वाजणार आहे. त्यामुळे या स्पैर्धेकडे क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोन महान आंतरराष्ट्रीय खेळाडूंची ही अखेरची आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्वेण्टी-२० स्पर्धा असेल. मुंबई इंडियन्स हे आयपीएल २०१३ चे चॅम्पियन्स आहेत. त्यामुळे आपल्या चॅम्पियन्स खेळाडूला विजयाची भेट देण्यास उत्सुक आहेत. तर राहुल द्रविडच्या राजस्थानची फौज आपल्या कर्णधाराला चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावून देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरताना दिसतील.
चॅम्पियन्स लीगच्या लढाईत मुंबई आणि राजस्थानबरोबरच ट्वेण्टी-२० मधील इतर आठ सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय संघ शनिवारपासून एकमेकांविरुद्ध उतरताना दिसतील. मुख्य आठ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तर १७ तारखेपासून सुरु झालेल्या पात्रता फेरीतून दोन संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
दहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटात मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, हायवेल्ड लायन्स, पर्थ स्कॉर्चर्स आणि पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणारा एक संघ अशा पाच संघांचा समावेश आहे. ‘ब’ गटात चेन्नई सुपर किंग्स, टायटन्स, ब्रिस्बेन हीट, त्रिनिदाद अँड टोबॅको आणि पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणारा एक संघ अशा पाच संघांचा समावेश आहे.
रॉबिन राऊंड पद्धतीनं खेळवण्यात येणा-या साखळी सामन्यांतून चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर ६ ऑक्टोबरला दोन सर्वोत्तम संघांमध्ये चॅम्पिय़न्सशिपसाठी अंतिम लढत होणार आहे.