न्यायालयातून आयएमच्या दहशतवाद्याचे पलायन

मुंबई- गुजरातमधील अहमदाबाद व सुरत येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयीत आरोपी व इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख सदस्य अफजल उस्मानीने मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयातून शुक्रवारी पलायन केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

स्फोटांत वापरण्यात आलेल्या मोटारींची चोरी करणे व स्फोटांसंबंधातील धमकींचे ईमेल पाठवणे, असे आरोप त्याच्यावर आहेत. मुंबई गुन्हे शाखेने 2008 साली इंडियन मुजाहिदीनची मीडिया सेल उद्धस्त करत 22 सदस्यांना अटक केली होती. त्यात उस्मानीचाही सहभाग होता. विशेष मोक्का न्यायालयात उस्मानी व त्याच्या साथीदारांविरोधात शुक्रवारी आरोप निश्चित करण्यात येणार होते.

नवी मुंबईतील पोलिसांनी तळोजा कारागृहातून आठ जणांना न्यायालयात दुपारी आणले. मात्र दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान उस्मानी गायब झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची तात्काळ माहिती स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथकाला देण्यात आली. त्यानुसार मुंबईतून बाहेर जाणा-या सर्व मार्गावर नाकाबंदी करण्यात आली असून सर्व पोलिस ठाण्यांना उस्मानीचा फोटो पाठवण्यात आला आहे. कुलाब्यातील स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे उपायुक्त (परिमंडळ-1) रविंद्र शिसवे यांनी सांगितले.