पुणे, -सामाजिक जीवनातील एका महत्वाच्या व्क्तीचा दिवसाढवळ्या खून होतो आणि त्याचा एक महिना तपासही लागत नाही. याबद्दल राजकीय व सामाजिक जीवनात आश्चर्य व्यक्त होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला, तरी तपासात यश आले नाही. एक महिन्याच्या तपासामध्ये मारेकर्यांविषयी ठोस अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली नसल्याने, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
एक महिन्यापूर्वी झालेल्या डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे वृत्त वार्यासारखे शहरासह संपूर्ण राज्यात पसरले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. परंतु, घटनास्थळापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या पोलिसांच्या नाकेबंदीला भेदून हे मारेकरी पसार झाले. डॉ. दाभोलकरांची हत्या करून मारेकरी दुचाकीवर बसून शनिवार पेठेतील शिंदेपार जवळच्या गल्लीतून पळून गेल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना देताच, लागलीच तपास यंत्रणेला वेग देत शनिवार पेठ, नारायण पेठ आणि आसपासच्या परीसरासह शहरातील विविध रस्ते आणि पेट्रोल पंपांवरील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. यातील एक सीसीटीव्ही फुटेज लंडन येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. यामधूनही मारेकर्यांचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्याकडे आहे. सुरवातीला गुन्हे शाखेची आठ पथके तयार करण्यात आली असून, खुद्द पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी पुण्यात घेतलेल्या एका बैठकीमध्ये तपास पथके आणखी वाढवण्याचे आदेश दिल्यावर 23 हून अधिक तपास पथके वाढवण्यात आली. प्रत्येक पथकाला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे.
डॉ. दाभोलकरांची हत्या करणार्या मारेकर्याची प्रत्यक्षदर्शी पाहिलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे एका संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले. हे रेखाचित्र प्रत्येक पोलीस स्टेशन, अधिकारी आणि कर्मचार्यांच्या खिशात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेतील युनिट आठचे एक पथक पुण्यात दाखल झाले. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी तपासाचा आढावा घेत, मुख्यंमत्र्यांनी या प्रकरणात एटीएस प्रमुख राकेश मारिया यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले. त्यानुसार मारिया यांनी पुण्यात येऊन तपासाची माहिती घेतली. दुसरीकडे वनमंत्री पतंगराव कदम यांनी एका कार्यक्रमात ‘जमत नसेल तर प्रकरण सीबीआयकडे सोपवा अशी टीका गृहखात्यावर केली. मात्र, पोलीस आयुक्त आणि गृह खात्याकडून पोलिसांना ‘ना ऊमेद होऊ नका’ असे सांगत धीर दिला.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील हल्लेखोरांविषयीची माहिती देणार्यास राज्य शासनाने दहा लाख, तर शहर पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. यावेळी पोलिसांना मिळालेला दुचाकीच्या क्रमाकांवरून दोन हजारांहून अधिक दुचाकींची तपासणी करण्यात आली. तर हजारो नागरिकांची चौकशी करण्यात आली. तसेच, सांगवी येथील हिंदू जनजागृती समितीच्या एक महिला, गोवा येथून आणलेल्या सनातन प्रभातच्या साधकाकडे चौकशी केली. कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांना सोडण्यात आले. डॉ. दाभोलकरांची हत्या सुपारी देऊन केली असल्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहरातील 200 तर शहराबाहेरील 700 हून अधिक गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात आली. तसेच, सुपार्या घेऊन हत्या करणारे राज्य आणि परराज्यातील गुन्हेगार, वेगवेगळ्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी, गुन्हेगार टोळ्या, भोंदू बाबा, बंगाली बाबा, मांत्रिक-तांत्रिक, सनातनी विचारांच्या धार्मिक संघटना, अशा हजारो लोकांकडे तपास करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस असे कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाही.