आरबीआयने केली रेपोरेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ

मुंबई – भारतीय रिजर्व बँक (आरबीआय) चे नवनियूक्त गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तिमाही पतधोरणात आज (शुक्रवार) आरबीआयने रेपोरेटमध्ये एक चतूर्थांश एवढी वाढ केली आहे. यामुळे रेपोरेट 7.25 वरुन 7.50 एवढा झाला असून रिवर्स रेपोरेट 6.25 वरुन 6.50 एवढा झाला आहे. या व्याजदरवाढीमुळे गृहकर्ज, वाहन कर्ज महागणार आहे.

या व्याजदरवाढीचा परिणाम शेअरबाजारावरही पडला असून आज शेअरबाजारात 500 अंकांनी घसरण झाली आहे. शेअर बाजारातील ही घसरण मागील तीन वर्षातील सर्वात मोठी घसरण असल्याचे म्हटले जात आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही 69 पैशांनी घट झाली असून 62.46 वर आला आहे.

आरबीआयने मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (एमएसएफ) रेटला 0.75 टक्क्यांनी कमी केले असून एमएसएफ रेट 9.5 एवढा झाला आहे. तर बँक रेटही कमी करून 9.5 वर आणला आहे. रिजर्व बँकेने सीआरआरमध्ये कसलेच बदल केले नूसन ते 4 टक्क्यांवरच ठेवले आहेत. रघुराम राजन यांनी गव्हर्नर पद संभाळल्यानंतर त्यांनी हा पहिल्यांदाच मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यू केला आहे.