रोहतक – हरियाणातील रोहतक जिल्ह्यामध्ये सगोत्र विवाह करणार्या प्रेमिकांचा मुलीच्या नातेवाईकांनी निर्घृणपणे खून केला. मुलीची शेकडो लोकांसमोर दगडाने ठेचून हत्या केली तर मुलाची केवळ हत्याच केली असे नाही तर त्याचा शिरच्छेद करून त्याचे मुंडके त्याच्या घरासमोर टाकले. ही घृणास्पद घटना घडलेले ठिकाण दिल्लीपासून केवळ ८० किलोमीटर अंतरावर आहे. या संबंधात पोलिसांनी मुलीची आई, तिचे वडील आणि काका यासह चौघांना अटक केली आहे.
मारले गेलेल्या मुलीचे नाव निधी असे असून तिचे धरमिंदर या मुलावर प्रेम होते मात्र त्यांचे गोत्र एकच असल्यामुळे त्याच्या लग्नाला मुलीच्या आईवडीलांचा विरोध होता. मात्र हा विरोध लाथाडून निधी आणि धरमिंदर यांनी दिल्लीला जाऊन विवाह केला. मुलीच्या आईने आणि वडीलांनी तिची तिथे भेट घेऊन तिला लाडीगोडी लावून घराकडे आणले आणि तिला काही त्रास होणार नाही असे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात मात्र घरी आल्यानंतर गावातल्या लोकांना जमवून त्यांच्यासमोर आई, वडील आणि काका यांनी दगडाने ठेचून तिचा खून केला.
त्यानंतर या लोकांनी धरमिंदरला गाठून त्याला जबर मारहाण केली. काही लोक त्याला अर्धातास मारत होते. त्याचे हात पाय तोडण्यात आले आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यावर त्याचे मुंडके छाटण्यात आले. ते त्याच्या घरासमोर टाकण्यात आले. मुलीला मारून टाकल्यानंतर तिचा अंत्यविधी गुपचूप केला जात होता. परंतु तोपर्यंत पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी चिता विझवली. मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. या संबंधात चौघांना अटक करण्यात आलेली आहे.