नवी दिल्ली – गेल्या ८ वर्षात भारतामध्ये एक हजार जातीय दंगली झाल्या. त्यात ९६५ लोक मारले गेले तर १८ हजार लोक जखमी झाले. या दंगलींमुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान तर कधीही भरून न येणारे आहेच पण मोजतासुध्दा न येणारे आहे. जातीय दंगलींच्या बाबतीत ५ राज्ये सर्वाधिक धोकादायक आढळली. या ५ राज्यांमध्येच एकूण हजार दंगलींपैकी निम्म्या दंगली झाल्या. मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या पाच राज्यांमध्ये अधिक जातीय दंगली झाल्या.
उत्तर प्रदेशात जातीय दंगली झाल्या आणि त्यात काही बळी पडले परंतु राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत विचार केला असता हे प्रमाण वरील पाच राज्यांच्या मानाने कमीच पडते. मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक दंगली झाल्या. त्या खालोखाल कर्नाटक आणि महाराष्ट्रात दंगलींचे प्रमाण जास्त आहे. गुजरातचा चौथा आणि केरळचा पाचवा क्रमांक आहे.
जातीय दंगली कमी झालेली राज्ये म्हणून आंध्र प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि पंजाब यांचा उल्लेख करता येईल. राज्यातील दंगलींचे प्रमाण मोजताना झालेल्या दंगलींची संख्या न मोजता दर दशलक्ष संख्येमागे त्यांचे प्रमाण मोजले जाते आणि त्या हिशोबाने ही पाच राज्ये कमीत कमी जातीय दंगलींची ठरली आहेत. या पाच राज्यांमध्ये दर दशलक्ष लोकसंख्यमागे केवळ दोन दंगली असे तर प्रमाण आहेच पण दंगलीतील मृतांची संख्यासुध्दा कमी आहे.