येडियुरप्पांचा मोदींचा पाठिबा मात्र पक्ष विलीनीकरण नाही

बेंगलोर – कर्नाटक जनता पक्ष या माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पक्षाने भाजपमध्ये विलीन न होण्याचा निर्णय एकमुखाने घेतला असल्याचे येडियुरप्पा यांनी जाहीर केले आहे. गेले दोन दिवस पक्षाच्या बैठका होत होत्या त्यात हा निर्णय घेतला गेला आहे. मात्र कर्नाटक जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुका राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चा घटकपक्ष म्हणून लढवले असेही त्यांनी जाहीर केले आहे.

कर्नाटक जनता पक्षाने स्वतंत्र पक्ष म्हणूनच राहणे पसंत केल्याचे सांगून येडियुरप्पा म्हणाले की आम्ही कोणत्याच पक्षात विलीन होणार नाही. मात्र पंतप्रधानपदासाठी मोदी यांना आमचा पूर्ण पाठिबा आहे. मोदी हे थोर नेते आहेत आणि मोदीच या निवडणुका जिकतील यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून येडियुरप्पा यांना खाण घोटाळा प्रकरणात पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. मात्र मोदींच्या नावची पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून घोषणा होताच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये येण्याची मनीषा व्यक्त केली होती. येडियुरप्पा बाहेर पडल्याने ५ मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला सत्ता गमवावी लागली असून तेथे सध्या काँग्रेसचे सरकार आहे.