मेक्सिकोला बसला चक्रीवादळाचा तडाखा

मेक्सिको – येथे चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, त्यात 34 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ईशान्य आणि नैर्ऋत्य अशा दोन्ही बाजूंनी चक्रीवादळ आले असल्याने हाहाकार उडाला. मुसळधार पावसाने अनेक शहरांत पूरमय स्थिती निर्माण झाली आहे. डोंगराळ भागांत दरडी कोसळल्याने अनेक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या भीषण स्थितीमुळे मेक्सिको सरकारने तात्काळ राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वेराक्रुझ या प्रांताला बसला व त्यात प्रांतातील 23 हजार लोक बेघर झाले आहेत. त्यापैकी नऊ हजार जणांना आपत्कालीन छावण्यांमध्ये आसरा देण्यात आला आहे. 20 महामार्ग आणि 12 पूल उखडले असल्याने या प्रांतातील रस्ते वाहतूक थांबवण्यात आली आहे.

याच प्रांतातील अल्टोटोंगा शहरात एका बसवर दरड कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती वेराक्रुझ प्रशासनाने दिली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या अनेक शहरांमधील वीजपुरवठा आणि दूरध्वनी सेवा बंद करण्यात आली आहे.