चंडीगढ – पंजाबच्या शिरोमणी अकाली आणि कॉंग्रेस या पक्षांचे काही मंत्री आणि जेष्ठ नेते मादक द्रव्याच्या चोरट्या व्यापारात गुंतले असल्याचा आरोप पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (तुरुंग) शशी कांत यांनी केला आहे. आपण सहा वर्षापूर्वीच अशा मंत्र्यांची नावे सरकारला कळवली आहेत. असेही शशी कांत यांनी पंजाब उच्च न्यायालयाच्या न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सांगितले.
पंजाबातील नेते ड्रग माफिया
मादक द्रव्याच्या व्यापारात हे मंत्री भरपूर पैसा कमावतात आणि तोच पैसा निवडणुकीत वापरतात. त्यांना पोलीससुध्दा सहकार्य करतात. असा खळबळजनक आरोपही शशी कांत यांनी केला. त्यांनी पंजाबमध्ये वाढत चाललेल्या मादक पदार्थांच्या व्यापाराबद्दल राज्य शासनाला सावध केले आहे आणि त्या अर्थाने पाठविलेले पत्र उच्च न्यायालयाला पाठविलेले आहे. मात्र शासन आणि न्यायालय यांच्या पैकी कोणीही या पत्राची दखल घेतली नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्यातले ड्रग माफिया मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे आणि सहकारामुळे मोकळेपणी फिरत असतात. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. राज्यातल्या या व्यवसायात गुंतलेल्या मंत्र्यांनी काही ड्रग माफियांना हाताशी धरून आपली हत्या घडविण्याचा प्रयत्न चालविला होता असेही शशी कांत यांनी म्हटले आहे.
