पुणे : – हिरे ते चॉकलेट आणि जैव तंत्रज्ञानापासून ते जहाज उद्योगापर्यंत अनेक क्षेत्रात भारत आणि बेल्जियम या दोन देशातील आर्थिक संबंध दृढ होत असून सध्या युरोपातील मंदीमुळे आमच्या देशात गुंतवणूक केल्यास भारतीय उद्योजकांना चांगला फायदा मिळेल. याखेरीज वृद्धांचे संगोपन आणि नर्सिंग क्षेत्रात आम्हाला मनुष्यबळ लागते अशी माहिती बेल्जीयमचे वाणिज्य प्रतिनिधी कार्ल बॉश यांनी आज येथे निवडक पत्रकारांना दिली.
आमच्या देशातील वृद्धांची संख्या वाढत असून त्यांची सेवा आणि देखभाल करण्यास अकुशल मनुष्यबळाची गरज आहे. केरळातील अनेक मुली आमच्या देशात नर्सिंग सेवेत आहेत आणि हीसंख्या वाढते आहे. जहाज बांधणी, वाहन उद्योग, ,रसायने , यंत्रोद्योग, उच्च शिक्षण, चॉकलेट उत्पादन, हिरे पैलू प्रक्रिया अशा अनेक क्षेत्रात उभय देशातील सहकार्य वाढू शकते अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बेल्जियम हा युरोपातील भारताचा दोन क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी असलेला देश आहे असे नमूद करून ते म्हणाले की द्विपक्षीय व्यापार १ ३ अब्ज युरो एवढा असून गेलि दोन तीन वर्षे वर्षे मंदी असूनही तो आता स्थिर झाला आहे.
टी सी एस, इन्फोसिस , क्रॉम्पटन ग्रीव्हज अशा अनेक कंपन्यांनी बेल्जीयममध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अशा कंपन्या आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाला वेगवान व्हिसा सेवा आम्ही पुरवतो अशी माहिती देऊन ते म्हणाले की उभय देशातील व्यापार वाढावा यासाठी राजकुमारी अस्ट्रीड २ ३ – २ ९ नोव्हेंबर या काळात भारताला भेट देणार असून ३ ० ० उद्योजकांचे पथक त्यांच्यासोबत येणार आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये युरोपेलीया हा बेल्जियमचा सांस्कृतिक महोत्सव भारतात आयोजित केला जाणार असून त्याचे उदघाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते केले जाणार आहे.
बेल्जीयमचे धोरण भारताला धडा
कोणीही उद्योजक गुंतवणूक प्रस्ताव घेऊन थेट बेल्जियम अर्थ मंत्रालयाकडे जाऊ शकतो आणि त्याच्या अर्जावर दोन ते तीन दिवसात निर्णय होतो. इतकेच नव्हे तर कर यंत्रणा आणि धोरण पुढील पाच ते दहा वर्षे काय राहणार हे त्यावेळी स्पष्ट केले जाते असेही बॉश यांनी जाहीर केले . उद्योगात पुढे राहण्यास धोरणात लवचिकता कशी ठेवली जाते याचे हे द्योतक आहे आणि भारताने त्यातून धडा घ्यायला हवा. ५ ० कोटी युरोपीय ग्राहकांपर्यंत २ ४ तासात पोचण्याचा मार्ग म्हणजे बेल्जियम असे त्यांनी नमूद केले .