नवी दिल्ली – पाच राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग या महिना अखेर करणार असल्याचे या कार्यालयातील वरीष्ठ अधिकार्यांकडून समजते. या निवडणुका म्हणजे २०१४ सालात होणार असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप काँग्रेसची सेमीफायनल असल्याचे समजले जात आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम, दिल्ली व छत्तीसगढ या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यांची घोषणा २७ ते २९ सप्टेंबर मध्ये केली जाणार आहे. या राज्यांत नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतमोजणी पूर्ण होणार आहे. या निवडणूक निकालांचा परिणाम पुढे होणार असलेल्या लोकसभा निवडणुकांवर पडणे निश्चित आहे.
दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश व मिझोराम येथे एकाच फेजमध्ये मतदान होणार आहे तर छत्तीसगढमध्ये दोन फेजमध्ये मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी व विशेषतः छत्तीसगढ येथील निवडणुकांसाठी पुरेसे सुरक्षा रक्षक देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाशी नुकतीच चर्चा केली आहे. छत्तीसगढ मध्ये नक्षल वाद्यांचा उपद्रव मतदाना दरम्यान होऊ शकतो यासाठी किमान ५० ते ६० हजार निमलष्करी दलातील जवानांची मागणी आयोगाने केली आहे. मात्र सध्या उत्तर प्रदेशातील दंगल व तेलंगणा मुळे बरेच मोठे दल त्या भागात तैनात आहे. सुरक्षेची हमी मिळताच निवडणूक आयोग निवडणुकांची घोषणा करणार आहे असे समजते.