नवी दिल्ली – चीनने क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात गती घेऊन ११ हजार २०० किलोमीटर पल्ल्याचे अण्वस्त्र घेऊन जाऊ शकणारे डीएफ-३ हे क्षेपणास्त्र विकसित केले असले तरी भारतही त्याबाबतीत मागे नाही. लवकरच भारताचे शास्त्रज्ञ १० हजार किलोमीटर पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करतील आणि अशा परिस्थितीत निम्मे जग भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या टप्प्यात येईल असा विश्वास भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. भारताच्या संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र विभागाचे प्रमुख अविनाश चंदर यांनी या विश्वासास दुजोरा दिला आहे.
भारताच्या अग्नि-५ या ५ हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी नुकतीच यशस्वी झाली. ती झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अविनाश चंदर यांनी आपणही क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात चीनशी बरोबरी करू शकतो असे आत्मविश्वासाने सांगितले. एकदा क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान अवगत झाले की त्याचा पल्ला वाढवत नेणे हा काही फार मोठा प्रश्न राहत नाही. आपल्याला तंत्रज्ञान अवगत आहे. त्यामुळे आपण वरचेवर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करू शकू असे ते म्हणाले.
अग्नि-५ या क्षेपणास्त्राला पल्ला ५ हजार किलोमीटर असल्याने पूर्ण चीन हा देश त्याच्या टप्प्यात आलेला आहे. यूरोपचा काही भाग तसेच आफ्रिकेचा काही भागसुध्दा अग्नि-५ च्या टप्प्यात आलेला आहे. क्षेपणास्त्रांच्या पल्ल्याच्या बाबतीत आपल्याला सावधपणे बोलण्याची गरज नाही आपण त्याबाबतीत वाटेल ते करू शकतो असेही चंदर म्हणाले.