नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत नरेन्द्र मोदी यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा मार्ग सोडण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानच्या शासकांनी भारताशी लढाई करण्याचा नाद सोडून आपल्या देशातल्या गरिबीशी लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. पाकिस्तानने विकासाचा मार्ग अवलंबिल्यास त्यांना गेल्या ६० वर्षात कधी पाहिली नाही एवढी प्रगती साधता येईल आणि देशातल्या तरुणांचे भवितव्य घडवता येईल असे ते म्हणाले.
मोदी यांनी हरियाणात रेवारी येथे माजी सैनिकांच्या मेळाव्यासमोर भाषण केले. या मेळाव्याला हजारो माजी सैनिक हजर होते. भारताचे सेनाधिकारी खर्या अर्थाने सेक्युलर आहेत, सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यापासून सेक्युलॅरिझमचे धडे घ्यावेत असा टोमणा त्यांनी कॉंग्रेस पक्षाला लगावला. सध्याचे सरकार आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले आहे अशी टीकाही त्यांनी केली.
या कार्यक्रमाला निवृत्त लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग हे उपस्थित होते. अनेक निवृत्त लष्करी अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. जनरल व्ही. के. सिंग हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तिला त्यांच्या या कार्यक्रमातल्या उपस्थितीने दुजोरा मिळाला. त्यांनी या भाषणात बोलताना, मोदी लष्कराचे मनोबल वाढवू शकतील असा विश्वास सिंग यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. मोदी यांनी अग्नि -५ या क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणा बद्दल भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.