काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा’ – राजनाथ

नवी दिल्ली – आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला आहे, हा आमच्या पक्षाचा आणि लोकभावनेचा निर्णय होता. काँग्रेसला जर एवढेच वाटत असेल तर त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असं आव्हान भाजपचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिले आहे. तसेच घरातील मोठ्या व्यक्तींने आपल्या मुलाला काही बोलले म्हणून घरात फाटाफूट होत नाही असं सांगत त्यांनी आडवाणी नाराज नसल्याचं स्पष्ट केले आहे.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा झाल्यानंतर पक्षात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी एकाकी पडल्याचे चित्र आहे. पण पक्षातल्या मतभेदांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करताना दिसतायत. आडवाणी नाराज नाहीत, असा दावा भाजपचे नेते करत आहे. 25 सप्टेंबरला भोपाळमध्ये भाजपचा कार्यक्रम आहे. त्यात नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण आडवाणी सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलंय.

तर काँग्रेसची ही परंपरा नाही. आम्ही निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधानपदाचे उमेदवार कधीच जाहीर करत नाही. आमचा संविधानावर विश्वास आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस हायकंमाडच आमचा उमेदवार ठरवेल आणि आमचाच उमेदवार पंतप्रधान होईल असे उत्तर काँग्रेसचे नेते रशीद अल्वींनी दिले आहे.