चित्रपटसृष्टीत कपूरच चांगले

हिंदी चित्रपटसृष्टीत कपूरच सर्वात चांगले कलाकार असल्याचं मत बॉलिवूड अभिनेत्री बेबो उर्फ करिना कपूर हिने व्यक्त केलंय एका मुलाखतीत करिना म्हणाली, की ‘मला रणबीरसोबत काम करायला आवडते, तो चांगले काम करतो. मला माझे वडील आणि बहिणीसोबतही काम करायचे आहे. मला वाटते की, कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात चांगले कलाकार आहेत. कपूर असणे म्हणजे रक्ताच्या प्रत्येक थेंबात अभिनय भरलेला असतो.’ रणबीर आणि करिना हे झोया अख्तरच्या चित्रपटात एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे, परंतु याबाबत अजूनपर्यंत काहीच नक्की होत नाही आहे.

करिनाचे पणजोबा पृथ्वीराज कपूर यांचा चित्रपटसृष्टीचा वारसा तीन मुलांनी राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनी पुढे चालू ठेवला. तर शशी कपूर यांची पत्नी जेनिफर कपूर ह्या चित्रपटात काम करणाऱ्या पहिल्या कपूर खानदानाच्या महिला ठरल्या. यानंतर राजकपूर यांची तीन मुले रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर यांनीही चित्रपट जगतात प्रवेश केला. पुढे चौथ्या पिढीमध्ये रणधीर आणि बबिता यांची मुलगी करिश्माने ही परंपरा चालू ठेवली आणि नंतर करिनाने आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपटात प्रवेश केला. मला चित्रपटात काम करायला खूप गंमत वाटते. मी खरंच भाग्यवान आहे की मला पडद्यावर विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तसेच लोकांचे मनोरंजन करण्यातही मी यशस्वी राहिले. माझा आतापर्यंतचा चित्रपटसृष्टीतील प्रवास खूपच चांगला होता, असे करिना म्हणाली.