दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत अभाविपला यश

नवी दिल्ली – दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला भरघोस यश मिळाले. पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अभाविपच्या वाट्याला चार जागा आल्या. तर कॉंग्रेस प्रणित नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या संघटनेला केवळ एक जागा मिळाली. अभाविपचे राजू रावत आणि अमन आवा हे अध्यक्ष आणि सहसचिव म्हणून निवडून आले तर उत्कर्ष चौधरी हा उपाध्यक्ष म्हणून निवडून आला. एनएसयूआयची करिश्मा ठाकूर ही एकटीच सचिव म्हणून निवडून येऊ शकली.

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. कारण त्या निवडणुकीत अभाविप आणि एनएसयूआय या दोन संघटना हिरीरीने उतरत असतात. या दोन्ही संघटनांचा अनुक्रमे भाजपा आणि कॉंग्रेसशी संबंध असल्यामुळे निवडणुकीतील यशापयशाचे परिणाम राजकारणावर होत असतात. या निवडणुकीत ४० टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले. अध्यक्ष पदासाठी १७ आणि अन्य तीन पदांसाठी १० उमेदवार रिंगणात होते. मात्र या दोन संघटनांमध्येच मुख्य लढत होती. तिच्यात अभाविपने बाजी मारली.