जालना- शाळेप्रमाणेच महसूल विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रंथालयांच्या पडताळणी केली होती. त्यामध्ये राज्यातील ३८५ ग्रंथालये बोगस असल्याचे आढळून आले आहे. या सर्व ३८५ बोगस ग्रंथालयांची मान्यता आगामी काळात रद्द केली जाणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केली.
शासकीय अनुदानावर मिळणा-या शाळांप्रमाणेच राज्यातील सर्व ग्रंथालयाच्या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी शासनाने ही पडताळणी सुरू केली होती. यामध्ये राज्यातील ४० टक्के ग्रंथालयांत त्रुटी आढळल्या. तर मराठवाडा विभागातील ४ हजार २७२ सार्वजनिक ग्रंथालयांपैकी केवळ १ हजार ८२५ ग्रंथालये शासकीय निकषांचे पालन करत असल्याचे आढळले. त्याशिवाय ३८५ ग्रंथालये बोगस असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहेत.
त्याचप्रमाणे किरकोळ स्वरूपाच्या त्रुटी असलेल्या राज्यातील सुमारे पावणेदोन हजार ग्रंथालयांना सुधारणा करण्याची नोटिस दिली आहे. त्यामध्ये आगामी काळात सुधारणा न झाल्यास त्या ग्रंथालयावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे यावेळी पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी स्पष्ट केले आहे.