मोदींबाबत व्हिसा पॉलिसीत बदल नाही

वॉशिग्टन – भाजपने आगामी लोकसभेसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदीच्या नावाची घोषणा केली असली तरी गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी अमेरिकेच्या व्हिसा पॉलिसीत कोणताही बदल होणार नसल्याचे स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या मेरी हार्फ यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही अन्य देशांच्या नागरिकांप्रमाणे मोदीही अमेरिकन व्हीसा साठी अर्ज करू शकतात असे सांगून त्या म्हणाल्या की अन्य अर्जदारांप्रमाणेच मोदी यांनाही व्हिसा मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. अमेरिकन कायद्यानुसार व्हिसा साठीच्या अर्जांचा विचार केला जातो व त्याच पद्धतीने मोदींच्या अर्जाचाही विचार केला जाईल.

अमेरिकन कायद्यानुसार मोदींच्या व्हिसा अर्जाचा रिव्हयू काय असेल हे सांगता येणार नाही व त्यामुळेच त्यांना व्हिसा दिला जाईल का नाही हेही सांगता येणार नाही असेही हार्फ यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नांव घोषित केले गेले असले तरी भारताच्या स्थानिक राजकारणात पडण्याची अमेरिकेची इच्छा नाही आणि त्यासंदर्भात अमेरिकेला कांही कॉमेंटही करायची नाही असेही हार्फ म्हणाल्या.