छब्बड हाऊसजवळ बॉम्बच्या अफवेने पळापळ

पुणे – कोरेगाव पार्क येथील ज्यू धर्मियांच्या छब्बड हाऊसच्या बाहेर बॉम्ब असल्याच्या अफवेने शुक्रवारी कांही काळ येथील वातावरणात चांगलाच गोंधळ माजला. छब्बड हाऊस हे गेली कांही वर्षे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार छब्बड हाऊसजवळ असलेल्या बसस्टॉपवर दोन तरूण सकाळी उतरले. कांही काळ तेथे गप्पा मारून ते निघून केले. त्याचवेळी ड्यूटीवर असलेल्या पोलिसाला तेथे बेवारशी काळ्या रंगाची बॅग आढळली. त्याने त्वरीत ही घटना पोलिस नियंत्रण कक्षाला कळविली. बॉम्ब शोध पथकही बोलावले गेले. या बॅगेची तपासणी केली असता त्यात खाद्यपदार्थ आणि पाण्याची बाटली आढळली. मात्र या वेळेपर्यंत बॉम्ब सापडल्याची अफवा पसरल्याने या भागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

तीन वर्षांपूर्वी पुण्याच्या याच भागातील जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात १७ जणांना जीव गमवावा लागला होता व त्यावेळी ओशो आश्रम, छब्बड हाऊस दहशतवाद्यांच्या लिस्टवर असल्याचेही तपासात स्पष्ट झाले होते. गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.