मोदींच्या उमेदवारीने बदलली महाराष्ट्राची राजकीय समीकरणे

मुंबई – भाजपने आगामी लोकसभेसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजराथचे मुख्यमंत्री मोदी यांचे नांव जाहीर केल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकसभा निवडणुकांसाठीची राजकीय समीकरणे बदलली असल्याचे जाणकारांचे मत आहे. समाजवादी पक्षाने मुंबई ठाण्यासह उर्वरित महाराष्ट्रात व मुस्लीम बहुल भागात भक्कम उमेदवार दिले, तर महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीला लोकसभेत अनेक जागा गमवाव्या लागतील असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून त्यात मुंबईतील सहा व ठाण्यातील चार जागांचाही समावेश आहे. गेल्या म्हणजे २००९ सालच्या निवडणकीत मुंबईत एकही जागा सेना भाजप युतीला मिळविता आली नव्हती. यंदा मात्र गुजराथी समाजाचे मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिग यांचे उत्तर प्रदेश कनेक्शन, भाजप प्रदेशाध्यक्षपदी असलेले मराठी भाषिक देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यामुळे गुजराथी, उत्तर प्रदेशीय तसेच मराठी समाज मोठ्या प्रमाणावर सेना भाजप रिप. महायुतीकडे खेचला जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे. परिणामी युतीच्या लोकसभेच्या किमान सहा ते सात जागा वाढतील असेही सांगितले जात आहे.

मुंबईपुरता विचार केला तर केंद्रीय राज्यमंत्री मिलिद देवरा, राजस्थानचे काँग्रसे प्रभारी गुरूदास कामत, उत्तर मुंबईचे खासदार संजय निरूपम, दक्षिण मुंबईचे खासदार दलित नेते एकनाथ गायकवाड, उत्तर पूर्व मुंबई संजय दिवा पाटील यांच्या जागा अड चणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उत्तरमध्य मुंबईची प्रिया दत्त यांची जागा काँग्रेस राखू शकेल असेही मत जाणकार व्यक्त करत आहेत.