लखनौ – उत्तर प्रदेश राज्य सरकारने वादग्रस्तरित्या निलंबित केलेल्या नोईडाच्या उपजिल्हाधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांंना पुन्हा कामावर घेतले असून आपली निलंबनाची कारवाई चुकीची असल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. प्रत्यक्षात वाळू माफियाच्या दबावाखाली त्यांना निलंबित करण्यात आले होते पण वरकरणी मात्र मशिदीची भिंत बेकायदारित्या पाडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तो ठपका चुकीचा असल्याचे आता राज्य शासनाच्या या निर्णयाने सिद्ध झाले आहे.
दुर्गाशक्ती नागपाल कामावर रुजू
दुर्गाशक्ती नागपाल यांना कामावर येण्याचा आदेेश चार दिवसांखालीच देण्यात आला आहे पण तूर्तास ही बातमी कोणासही सांगू नये असा बजावण्यात आले आहे. तसे झाल्यास ही बातमी सर्वतोमुखी होईल आणि पुन्हा वाद निमार्र्ण होतील असे सरकारने त्यांना कळवले आहे. नागपाल यांना आता तरी महसूल मंडळावर काम करण्यास सांगण्यात आले आहे. या कामावर त्यांना कायम ठेवण्यात येणार नाही. त्यांना येत्या चार दोन आठवडयात त्यांचे नेमके काम काय आहे हे सांगून तिथे त्यांची बदली करण्यात येणार आहे.
या निलंबनाच्या वादाने राष्ट्रीय स्वरूप धारण केले होते आणि अनेक राजकीय पक्षांनी त्यात रस दाखवला होता. आता हे प्रकरण संपले असले तरीही दुर्गा शक्ती नागपाल यांना यापुढे आपल्या ज्येष्ठ अधिकार्यांचा सल्ला घेऊन काम करण्यास सांगण्यात आले आहे. विशेषत: त्यांनी संवेदनशील निर्णय घेताना वरिष्ठांशी अवश्य सल्ला मसलत करावी अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे.
