आदिवासी टोपीची सुनील गावस्कर यांना भुरळ

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात झारखंडच्या रांची येथे झालेला दुसरा टी २० सामना भारताने जिंकला आहे. मात्र या सामन्या दरम्यान उपस्थित असलेले महान क्रिकेटपटू  लिटल मास्टर सुनील गावस्कर यांना एका निराळ्याच वस्तूची मोहिनी पडली असल्याचे दिसून आले आहे. गावस्कर यांना यावेळी आदिवासी जमातीत बनविली जाणारी झाडाच्या पानाची टोपी झारखंड स्टेट क्रिकेट असो.चे उपाध्यक्ष अजयनाथ शाहदेव यांनी घातली आणि गावस्कर आदिवासींच्या या मोहक कलेवर एकदम खुश झालेच पण त्यांनी ही कला टीव्हीच्या माध्यमातून जगभर पोहोचेल असा आशावाद व्यक्त केला.

झाले असे कि सामना सुरु होण्यापूर्वी आदिवासी भागातील हेमा मुंडा ही तरुणी स्टेडीयम बाहेर झाडाच्या पानापासून बनविलेल्या टोप्या तिचे वडील आणि अपंग भावाबरोबर विकत होती. या टोप्या पर्यटकांचे आकर्षण आहेत. रांची येथे सामना होणार म्हणून हेमा टोपी विक्रीसाठी येथे आली होती. एका टोपीची किंमत ६० रुपये अश्या दराने टोप्या विकत असताना शाहदेव यांनी टोप्या पाहिल्या आणि खरेदी केल्या. त्यातील एका टोपी त्यांनी गावस्कर यांना घातली.

शाहदेव यांनी हेमाची चौकशी केली आणि स्टेडीयम आतून पहिले का अशी विचारणा केली तेव्हा हेमाने नाही असे उत्तर दिले. शाहदेव यांनी लगेच हेमा, तिचे वडील आणि भावाला सामन्याची तिकिटे देऊन स्टेडीयम मध्ये प्रवेश दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कधी पाहता येईल असे स्वप्न सुद्धा न पाहिलेल्या हेमाला हा अनुभव खूपच आनंदी करून गेला. विशेष म्हणजे सुनील गावस्कर नेहमीच आदिवासी खेळाडू, आदिवासी प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडू यांना मदतीचा हात देतात. आंतरराष्ट्रीय आदिवासी हॉकी खेळाडू गोपाल भांगरा यांना सुद्धा गावस्कर यांनी त्यांच्या आयुष्यभर दरमहा आर्थिक मदत दिली होती.