इंदौर – अल्पवयीन मुलीचे लैगिक शोषण केल्याप्रकरणी जोधपूर तुरुंगाची हवा खात असलेले आसाराम बापू यांना इंदैार येथील मोक्याची जागा सर्व नियम डावलून आश्रमासाठी दिली गेल्याप्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्या विरोधात इंदौर येथील व्यावसायिक दिग्विजयसिंग भंडारी यांनी दावा दाखल केला असल्याचे समजते. १६ सप्टेंबरला या संदर्भात न्यायालयात सुनावणी होणार आहे.
भंडारी यांच्या तक्रारीनुसार इंदौरच्या खांडवा रोड भागात आसाराम बापू याच्या आश्रमासाठी १९९८ साली बेकायदेशीर रित्या जागा दिली गेली. त्यावेळी काँग्रेसचे सरकार मध्यप्रदेशात होते आणि मुख्यमंत्री होते दिग्विजयसिंग. ७ हेक्टरची प्राईम लोकेशनची ही जागा दिग्विजयसिंग यांनी केवळ १ रूपया वार्षिक भाडेपट्टीवर आसाराम याला दिली असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. दिग्विजयसिंग हे आसारामबापूचे भक्त असल्याने गुरूदक्षिणा म्हणून ही जागा मातीमोल दराने दिली गेल्याचा आरोप भंडारी यांनी केला आहे. त्यावेळी या जागेचे मूल्य ५ कोटी रूपये इतके होते असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.