युनायटेड नेशन्स – गेल्या दशकात आशियात आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत सर्वाधिक संख्येने आले असल्याचे स्पष्ट झाले असले तरी अद्यापीही स्थलांतरासाठी लोकप्रिय देश म्हणून अमेरिकेचे स्थान अबाधित असल्याचे यूएनच्या अहवालात नमूद केले गेले आहे. यूएनच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिकल व सोशल अफेअर्सने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार गेल्या दशकात २३२ दशलक्ष नागरिकांनी विविध देशांत स्थलांतर केले असून हे प्रमाण जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ३.२ टक्के इतके आहे. २००० सालात १७५ दशलक्ष नागरिकांनी स्थलांतर केले होते.
यावेळच्या अहवालात विभाग, मूळ देश, स्थलांतर केलेला देश, लिंग, वय अशी विभागणी केली गेली आहे. अहवालानुसार विकसित देशांत स्थलांतर करून जाणार्यांची संख्या १३६ दशलक्ष इतकी आहे तर विकसनशील देशांकडे स्थलांतर करणार्यांची संख्या ९६ दशलक्ष इतकी आहे.
स्थलांतर योग्य रितीने होत असले तर समाज व आर्थिक विकासासाठी ते महत्त्वाचे योगदान ठरू शकते असे इकॉनॉमिक व सोशल अफेअरचे महासचिव वू होंगबो यांनी सांगितले. ते म्हणाले योग्य रितीने झालेल्या स्थलांतरांमुळे वैयक्तिक संधी अधिक मिळते त्याचबरोबर गरीबी कमी होण्यासाठीही त्याचा फायदा होतो. नैसर्गिक स्त्रोतांची विभागणी योग्य रितीने होण्यासही स्थलांतरांची मदत होत असते.