संशयित बोगस डॉक्टर सुषमा कोठारीला अटक

पुणे, – कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी सुषमा कोठारी हिला 14 सप्टेंबरपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

अँक्युपंक्चर पद्धतीने असाध्य रोग बरे करत असल्याचे आमिष दाखवून कोठारी ही रूग्णांची मोठया प्रमाणात दिशाभूल करत असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कायर्वाह डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर देशमुख यांनी तिच्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अमृता इंगळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

कोठारीचा जामीनअर्ज मंगळवारी फेटाळला गेला होता ; आणि पोलिसांनी तात्काळ तिला ताब्यात घेऊन अटक केली. कोठारी ही सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीमजवळील लोहिया हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर म्हणून काम करत होती. तिच्याकडे कोलोंबो येथील कॉस्मॅटिक या विषयाची पी. एच. डी. असल्याचे ती सांगते. मात्र तिच्याकडे कोणत्याही वैद्यकिय कौन्सिलचे प्रमाणपत्र नाही. तरीही डॉक्टर असल्याचे भासवत रुगणांची दिशाभूल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोठारीकडून मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र ताब्यात घेवून त्याची सत्यता पडताळणी करणे, तिने किती रुग्णांची तपासणी केली आहे. संबंधीतांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे का, पुणे तसेच पुण्याबाहेर तिने कोठे रुग्णालय सुरू केले आहे का, तिला पदवी प्रमाणपत्र कोणी दिले, ती श्रीलंकेत गेलेलीच नसताना कोलंबो येथील पीएचडी तिला कशी मिळाली आदी बाबींचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिल सुप्रिया मोरे-देसाई यांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने कोठारी हिला 14 सप्टेंबरपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

डॉ. लोहिया यांना सहआरोपी करण्याची अंनिस ची मागणी
सुषमा कोठारी ही डॉ. पु. भ. लोहिया यांच्या क्लिनीकमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत होती. डॉ. लोहिया हे रुग्णालयात उपस्थित नसताना सुषमा कोठारी ही रुग्णांवर उपचार करत असे. त्यामुळे तिच्याबरोबरच डॉ. लोहिया हे सुद्धा तितकेच जबाबदार असल्याने त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. समितीचे राज्याचे मुख्य सचिव मिलींद देशमुख आणि पुणे शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे.