नवी दिल्ली – देवबंदच्या दारूल उलूमने एक नवा फतवा जारी केलाय. या फतव्यानुसार मुस्लीमांनी स्वतः फोटो काढणं, आठवण म्हणून स्वतःचे फोटो काढणं हे पाप असून ते निषिद्ध असल्याचं बजावण्यात आलं आहे. मुस्लीमांना फक्त पासपोर्ट किंवा ओळखपत्रासाठी फोटो काढण्याची अनुमती दारूल उलूमने दिली आहे.
दारूल उलूमचा फोटोग्राफी बंदीचा नवा फतवा
सौदी अरेबियात मुस्लीमांना फोटो काढण्यासाठी किंवा काढून घेण्यासाठी कसलीही बंदी नाही. एवढंच नाही तर पवित्र मक्का शहरात देशीविदेशी फोटोग्राफर्सना प्रवेशही दिला जातो, आणि तेथील नमाजपठणाचं देशाविदेशात लाईव्ह प्रक्षेपणही केलं जातं, तरीही भारतात दारूल उलूमने फोटो काढण्यास आणि काढून घेण्यास मनाई केली आहे. देवबंद दारूल उलूमचे कुलगुरू मुफ्ती अब्दुल कासीम नोमानी यांनी पीटीआयला दारूल उलूमच्या नव्या फतव्याबाबत माहिती दिली.
फोटोग्राफी इस्लामला मान्य नाही. त्यामुळे मुस्लीमांनी यापुढे फक्त पासपोर्ट किंवा ओळखपत्र वगळता स्वतःचे फोटो काढू नये. तसंच इस्लामला व्हिडिओग्राफीही मान्य नाही. त्यामुळे लग्नसमारंभाचं व्हिडिओ शूटिंग करू नये असा आदेश त्यांनी जारी केला.
दारूल उलूमचे कुलगुरू मुफ्ती नोमानी यांना सौदी अरेबियात फोटोग्राफीला असलेल्या परवानगीबाबत विचारल्यावर त्यांनी सौदी अरेबियाला जे करायचं असेल ते करू द्या, आम्ही त्यांच्या निर्णयाला मान्यता देत नाही. ते जे करतात, ते सर्व योग्य असतं असं नाही, असा दावाही त्यांनी केला. सौदी अरेबिया इस्लामच्या वहाबी परंपरेला मानतो. वहाबी परंपरा ही इस्लामचा मूळ स्त्रोत मानली जाते. वहाबी परंपरेत फोटोग्राफीला मान्यता आहे. दारूल उलूमने जारी केलेल्या धर्मादेशाशी पूर्णपणे सहमती दाखवत मुफ्ती नोमानी यांनी हादितचा दाखला दिला.
हादितने फोटोग्राफीला पूर्णपणे मनाई केलीय. याच फतव्याचा आधार घेऊन एका इंजिनीयरिंग पूर्ण केलेल्या पण फोटोग्राफीमध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या तरूणाला फोटोग्राफीसाठी इस्लामसंमत नसल्याचा निर्वाळा दिला. या विद्यार्थ्याला मुफ्ती नोमानी यांनी इंजिनीयरिंगमधील एखादा व्यवसाय करण्याचा सल्ला देऊन फोटोग्राफीचं प्रशिक्षण न घेण्याविषयी बजावले आहे.
