दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी शुक्रवारी सुनावणार शिक्षा

नवी दिल्ली- दिल्ली गँगरेप प्रकरणी दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. दोषी आरोपींना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहेत. चारही आरोपींना काल कोर्टाने दोषी ठरवले. आज सकाळपासूनच कोर्टात दोन्ही वकिलांनी आपआपला युक्तीवाद मांडला. त्यानंतर कोर्टाने निर्णय शुक्रवारी होईल असे सांगितले.

सुनावणीसाठी आज चारही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. अक्षय, पवन, विनय आणि मुकेश यांच्या शिक्षेबाबत युक्तीवाद पूर्ण झाला. सरकारी वकिल दयन कृष्णन यांनी आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली. गँगरेपच्या घटनेनंतर काही दिवसांनी तरुणीचा मृत्यू झाला होता. आपल्या युक्तीवादात सरकारी वकील म्हणाले, या चारही आरोपींनी जो अक्षम्य गुन्हा केला आहे, त्यासाठी ते फाशीच्याच लायकीचे आहेत. \

आरोपींच्या वकिलांनी फाशीचा विरोध केला. कोर्टाच्या बाहेरच्या वातावरणामुळं सुनावणीवर परिणाम झाला आहे, असे आरोपीचे वकील म्हणाले. 16 डिसेंबर 2012 ला पॅरामेडिकलचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. एवढेच नाही तर त्यांनी गंभीर इजा पोहोचवत तिला बसखाली फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधिश योगेश यांनी काल म्हटले की, आरोपींनी पीडित मुलीवर केलेला अत्याचार आणि दिलेल्या जखमा अतिशय गंभीर स्वरुपाच्या होत्या. त्यात 18 जखमा या अंतर्गत होत्या. पीडित तरुणीच्या शरीरात लोखंडी रॉड टाकणे म्हणजे तिला मारण्याचाच प्रयत्न केल्याचे कोर्टाने म्हटले होते.

गँगरेपमधील आरोपी असलेला पवन गुप्ताचे वय बघता त्याला फाशीची शिक्षा देवू नये, असे त्याच्या वकिलाने म्हटले आहे. पवन गुप्ताचे वय 19 वर्ष आहे. त्याला सुधारण्याची एक संधी द्यावी, असे आरोपींच्या वकिलांनी कोर्टात म्हटले. त्याच्याहातून घडलेला गुन्हा हा पूर्वनियोजित नसून अचानक घडलेला होता. त्यामुळे त्याला जन्मठेप द्या फाशी नको, असा युक्तीवाद पवन गुप्ताच्या वकिलांनी केला.