जयपूर – भाजप प्रचार समिती प्रमुख, पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार व गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील जयपूर येथे काल घेतलेल्या पहिल्या प्रचारसभेला उत्तर म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज उदयपूरच्या सालुंबर मतदारसंघात सभा घेऊन काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राजस्थानातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी १७ सप्टेंबर रोजी बरण मतदारसंघात आणखी एक प्रचारसभा घेणार असल्याचे राज्याचे काँग्रेस महासचिव गुरूदास कामत यांनी सांगितले.
काल जयपूर येथे मोदींनी घेतलेल्या विराट सभेत भाजपने शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आज काँग्रसेची सभा होत आहे. मोदी यांची पंतप्रधानपदाचे उभेदवार म्हणून घोषणा होणार हे निश्चत झाल्यापासून काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांकडून कॉगेंसच्या प्रचार रणनिती संदर्भातील सूचना वाढू लागल्या आहेत असेही सांगितले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही राजस्थानात दोन प्रचार सभा घ्याव्यात असा प्रयत्न सुरू झाला असून या सभा बाडमेर आणि भिलवाडा येथे होतील असे समजते. इतकेच नव्हे तर २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकांत काँग्रेस सत्तेवर आली तर गांधीच पंतप्रधान होतील असे जाहीर केले जावे यासाठीही नेत्यांकडून दबाव टाकला जात असल्याचेही समजते.