केदारनाथ – जूनमध्ये आलेल्या पुरात वाहून गेलेल्या केदारनाथ मंदिरात तीन महिन्यांच्या खंडानंतर कालपासून नित्य पूजेला सुरूवात झाली. या पूजेने आता हे तीर्थक्षेत्र भाविकांना दर्शनासाठी रीतसर खुले झाले आहे. मंदिराचे मुख्य पुजारी रावल भीमशंकर लिंग शिवाचार्य यांनी सकाळी ७.३० वाजता मंदिरात प्रवेश केला आणि वेद मंत्राच्या घोषात तीन महिन्यांच्या खंडानंतरची पहिली पूजा केली.
केदारनाथाची नित्य पूजा सुरू
केदारनाथचा परिसर धुक्यांनी वेढला गेला होता. तरीसुध्दा राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ३०० कर्मचार्यांनी गेले १५ दिवस सतत राबून मंदिराच्या ५० फुटाच्या परिसरातील सारे दगड माती गोळा करून मंदिराचा परिसर स्वच्छ केला. त्यामुळे पूजा करणे शक्य झाले. अर्थात मंदिराकडे जाणारा सगळा रस्ता स्वच्छ झालेला नाही. त्याला आणखीन दोन ते तीन महिने लागतील.
१३ हजार ५०० फुट उंचीवरच्या हिमालयाच्या कुशीतील या तिर्थक्षेत्राच्या पूजा कधी सुरू होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता पूजा सुरू झाली असली तरी केदारनाथची यात्रा कधी सुरू करावी याबाबत विचार सुरू करण्यासाठी ३० सप्टेंबरला बैठक बोलावण्यात आली आहे. कालच्या पूजेच्या प्रारंभाला मुख्यमंत्री विजय बहुगुणा आणि बरेच पत्रकार येणार होते. पण वाईट हवामानामुळे त्यांना येता आले नाही.
हे सगळे लोक हेलिकॉप्टरने डेहराडूनहून केदारनाथकडे यायला निघाले परंतु दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर झेप घेऊ शकले नाही. केदारनाथपासून २२ किलोमीटर अंतरावरच्या गुप्त काशी येथे त्यांना थांबावे लागले. मात्र अशाही परिस्थितीत मंदिराचे कर्मचारी आधीच पोहोचले होते. त्यामुळे त्यांनी मंदिराचा गाभारा फुलांनी सजवला होता. पूजेच्या वेळचे वातावरण उत्साहाचे होते.
