विदर्भात वीज पडून सात जणांचा मृत्यू

अमरावती,- अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यांत धामणगाव तालुक्यातील विटाळा येथे दोन, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एरंडगाव येथे एक, तसेच तिवसा तालुक्यातील धामंत्री येथे एकाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. या विविध घटनांमध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

धामणगाव तालुक्यातील विटाळा येथील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून रमेश श्रीराम नांदणे (55), तर आशा हरिचंद्र डाहे (50) यांचा मृत्यू झाला तर हरिचंद्र डाहे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशीच एक घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एरंडगाव येथे घडली. छत्री घेऊन गावाबाहेर शौचास गेलेल्या अनिल श्यामराव अनारकर (16, रा. एरंडगाव) याच्यावर दुपारी अडीचच्या सुमारास वीज कोसळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

तिवसा तालुक्यातही दुपारी धुवांधार पाऊस कोसळला. शेतात काम करणा-या शगुना रामेश्वर थोटे (19) व मंदा अरुण टरके (50, दोघी, रा. धामंत्री) या दोन महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने शगुनाचा जागीच मृत्यू झाला तर मंदा जबर जखमी झाल्या आहेत. अमरावती तालुक्यातील तारखेड येथील दीपाली रमेश बोरवार (16) नामक युवती शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज कोसळल्याने जबर जखमी झाली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

यवतमाळ जिल्ह्यांत कळंब तालुक्यातील मजरा परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वीज कोसळल्याने मेंढपाळ कुटुंबातील तिघे ठार झाले तर एक जखमी आहे. साहेबराव मारनर (40), वाडीबाई मारनर (15), कांधा मारनर (4) अशी मृतांची नावे असून जुडाबाई मारनर (30) ही जखमी झाली. बाभूळगाव तालुक्याच्या वीरखेड येथील मेंढपाळ कुटुंब गेली काही दिवसांपासून मजरा शिवारात पाल टाकून वास्तव्याला आहे. सायंकाळी मारनर यांच्या पालावर वीज कोसळली.