बाई असणे हाच शाप झालाय

भारतात बलात्काराचे प्रकार वाढत चालले आहेत त्यामुळे एका संघटनेला जगभरातल्या महिलांच्या सुरक्षिततेची पाहणी करण्याची प्रेरणा मिळाली आणि या संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले की, केवळ भारतातच नाही तर जगात अनेक देशांत महिलांचे जगणे एवढे दुरापास्त झाले आहे की, बाई असणे हाच एक गुन्हा वाटायला लागला आहे. दक्षिण आशियात (म्हणजे भारत, पाक, बांगला देश, श्रीलंका ) तर पाहणी केलेल्या पुरुषांपैकी एक चतुर्थांश लोकांनी आपण आपल्या आयुष्यात कधीना कधी एखाद्या महिलेवर बळजबरी केली असल्याचे कबूल केले आहे. खरे तर आपण या गोष्टीला कबूल केले असे म्हणत आहोत पण प्रत्यक्षात त्यांना हा मुळी अपराध वाटतच नाही म्हणून त्यातले बरेच पुरुष आपला हा पराक्रम मिशीवर ताव मारून सांगतात. त्यातल्या निम्म्यापेक्षाही अधिक लोकांनी एकदा नव्हे तर अनेकदा बाईला तिची इच्छा नसताना आपल्या कामभावनेची शिकार बनवले असल्याचे म्हटले आहे. रशिया, जपान, इंडोनेशिया, इजिप्त, इत्यादी अनेक देशात हे सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा या प्रकाराचे प्रमाण देशा देशात वेगळे असल्याचे दिसून आले.

पापुआ न्यू गियाना या छोट्या देशात तर साठ टक्के पुरुषांनी आपल्या आयुष्यात अनेकदा बलात्कार केला आहे असे सांगितले. कंबोडिया, चीन, इंडोनेशिया या देशात तर हे प्रमाण २५ टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत आहे. इंडोनेशियातही हे प्रमाण फारच आहे. यातल्या बहुतेक पुरुषांनी आपण लैंगिक हक्क बजावण्याच्या भावनेतून महिलांवर सक्ती करतो असे नमूद केले. आपल्या मर्जीला आले की, आपण म्हणू त्या बाईने आपल्यासाठी तयार असले पाहिजे, तिला नाही म्हणण्याचा हक्कही नाही आणि तिच्या संमतीचा प्रश्‍नच नाही अशी यातल्या अनेकांची भावना आहे. किंबहुना पुरुष असण्याने तो आपला जन्मसिद्ध तसेच निसर्गाने घालून दिलेला अधिकार आहे असे त्यांंना वाटते. बलात्कार करण्यामागे करमणुकीचे कारण असते असेही सांगणारे अनेक बहाद्दर आहेत तर काही लोकांना एखाद्या बाईवर बलात्कार करणे ही तिला शिक्षा असते असे वाटते. शिवाय नवरा रागात आला की तो राग घालवण्यासाठी बाईने नवर्‍याला तिच्या मर्जीविरुद्ध शरीरसुख दिलेच पाहिजे असे आपले तत्त्व आहे असे अनेकांनी सांगितले. मात्र यातल्या ८० टक्के लोकांनी आपण हा अत्याचार दारूच्या नशेत असतानाच करीत असतो हे मान्य केले. यातल्या काहींनी बाई नशेत असताना तिच्याशी जबरी संबंध प्रस्थापित केल्याचे म्हटले आहे.

हे सारे प्रकार थांबवायचे असतील तर काय करावे लागेल याचा विचार करण्यासाठी ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. तिच्यानुसार बलात्कारात हात गुंंतलेल्या लोकांनी आपण हे कृत्य तारुण्यात पदार्पण करण्याच्या अवस्थेत म्हणजे पौगंडावस्थेत केल्याचे सांगितले. म्हणजे समाजातून ही कीड नाहीशी करायची असेल तर तरुणांवर जादा भर द्यावा लागेल. असेच एक सर्वेक्षण महिलांत करण्यात आले तेव्हा जगातल्या एक तृतियांश महिलांना कधी ना कधी अशा अतिप्रसंगाला सामोरे जावे लागले असल्याचे दिसून आले. या महिलांना या प्रकारापासून मुक्त करायचे असेल तर त्यांंना शक्यतो एकटे सोडू नये असे संशोधकांना वाटते कारण बलात्काराचे प्रकार महिला एकट्या असतानाच अधिकतर होतात. बलात्कार पीडित महिलांपैकी ३८ टक्के महिलांना आपल्या नवर्‍याच्याच बलात्काराला तोंड द्यावे लागले आहे. पण जगभरातले कायदे नवर्‍याने आपल्या बायकोवर केलेल्या बलात्काराला अपराध मानायला तयार नाहीत. नवर्‍याचा बायकोवर हक्कच असतो असे जगभरातले कायदे मानतात. हे सर्वेक्षण आशिया, आफ्रिका आणि यूरोप या खंंडात करण्यात आले. त्यापैकी रशिया हा यूरोपातला देश आणि इजिप्त हा आफ्रिकेतला देश या बाबतीत आघाडीवर आहेत असे दिसून आले.

रशियात तर महिलांना नवर्‍याची मारहाण फारच सहन करावी लागते. तिथे मारहाण हा अगदी रोजचा व्यवहार होऊन गेला आहे पण अजून रशियाच्या सरकारने अजूनही महिलांवर त्यांच्या घरात होणारे अत्याचार हा कायद्याने गुन्हा ठरवलेला नाही. पण नवर्‍याच्या मारहाणीला कंटाळलेल्या महिलांना नवरा नको असेल तर राहण्याची सरकारी व्यवस्था केली आहे. मॉस्को शहराच्या बाहेरच्या बाजूला हा आश्रम आहे. तिथे अशा महिलांनी घर सोडले असेल तर ते सोडल्या पासून महिनाभर राहिले तर चालते. रशियात आता २०१२ सालची आकडेवारी उपलब्ध आहे. तिच्यानुसार दरसाल १४ हजार बायका नवर्‍याच्या जाचाला कंटाळून घर सोडतात आणि या आश्रमात येऊन राहतात. ही आकडेवारी दररोज मोजली तर असे म्हणता येईल की, रशियात दररोज सरसराी ४० महिला घराचा उंबरठा कायमचा ओलांडून बाहेर पडतात. रशिया खालोखाल अशा महिलांची संख्या इजिप्त मध्ये जास्त आहे. काही लोकांना असे वाटते की, महिला आणि मुली भडक पोषाख घालून येतात त्यामुळे कामवासनेने त्रस्त झालेल्यांंना प्रोत्साहनच मिळते. पण इजिप्त मध्ये आपाद मस्तक बुरखा घातलेल्या महिलांनाही रोड रोमियोंनी आपले शिखर बनवले आहे. एकंदरीत जगात महिलांचे जीवन बेकार होणार आहे.