पुणे, – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करताना शहरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले आहे, त्याला राष्ट्रसेवा दलाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. हा वॉच विनाकारण ‘वॉच’ ठेवला आहे. तसेच, संघटनांच्या कार्यक्रमांतील हस्तक्षेप सुरु आहे तो थांबवावा, अशी मागणी राष्ट्रसेवा दलाचे सुभाष वारे आणि कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी केली आहे. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले.
डॉ. दाभोलकर यांची हत्या निषेधार्हच आहे. त्या घटनेचा तपास केलाच पाहिजे. मात्र, तो करत असताना संघटनांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने चौकशीसाठी बोलावले जात आहे. इतकेच नाही, तर संघटनांच्या वतीने सुरू असलेल्या कार्यक्रमांत तसेच, सभांच्या ठिकाणी पोलीस येतात. त्यामुळे पुरोगामी विचारांच्या संघटनांवर दडपण येत असून, कार्यकर्त्यांत अस्वस्थता वाढली आहे. पोलिसांनी संघटनांच्या कार्यात अशा प्रकारे हस्तक्षेप करणे योग्य नाही. तो त्यांनी थांबवावा, अशी मागणी त्यांनी वारे यांनी केली आहे.
आरोपींना अटक करून डॉ. दाभोलकर कुटुंबियांबरोबरच पुरोगामी संघटनांनाही पोलिसांनी न्याय द्यावा, इतकीच आमची मागणी आहे, असे सुभाष वारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.