जम्मू- पाकिस्तानने पुन्हा आपल्या कुरापती सुरु केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यातील दोन भारतीय चौक्यांवर पाकिस्तानने सोमवारी रात्री गोळीबार करत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय चौक्यांवर पाकिस्तानने सोमवारी रात्री सव्वानऊ ते साडेदहाच्या दरम्यान आणि पुन्हा पावणेबारा वाजता काही प्रमाणात गोळीबार केल्याचे सैन्य दलाचे प्रवक्ते एस. एन. अचार्य यांनी मंगळवारी सांगितले.
पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
गिग्रीयाल आणि लवूकीकान या भागात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यापूर्वी पाकिस्तानी सैन्याने सायंकाळी 5.20 वाजताही छोटी शस्त्रे आणि मध्यम पल्ल्याच्या गन मशीनद्वारे गिग्रीयाल आणि लवूकीकान या भागात गोळीबार केला बोता, असे ते म्हणाले.
पाकिस्तानच्या अधूनमधून कुरापती सुरुच असून एक जानेवारीपासून पाकिस्तानकडून 90 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यात सहा जवान शहीद झाले असून 13 नागरीक जखमी झाले आहेत.
