नवी दिल्ली – नवी दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणी आरोपी असलेल्या चौघांना जलदगती न्यायालयाने दोषी ठरवत अखेर निर्भयाला न्याय दिला आहे. या आरोपींना अजून शिक्षा सुनावण्यात आलेली नसून ती उद्या म्हणजेच 11 सप्टेंबरला सुनावण्यात येणार आहे. याबाबतीतला युक्तीवादही उद्याच सुरु होणार आहे.
अखेर निर्भयाला न्याय; चारही आरोपी दोषी
हा निकाल राजकीय दबावाखाली दिला गेला असल्याचे आरोपींच्या वकिलांचे म्हणणे असून या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुकेश सिंग, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर अशी या नराधमांची नावे आहेत. 16 डिसेंबर 2012 रोजी एका 23 वर्षीय प्रशिक्षणार्थी फिजिओथेरपिस्ट निर्भयावर 6 नराधमांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. यातल्या चार आऱोपींवर दिल्लीच्या जलदगती न्यायालयात खटला सुरू आहे.
एक आरोपी हा अल्पवयीन असल्यानं त्याच्यावर बालगुन्हेगारी प्रतिबंधक न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यातल्या मुख्य आरोपी राम सिंह याने तुरूंगातच आत्महत्या केली होती. या खटल्याच्या आत्तापर्यंत 130 सुनावण्या झाल्या असून 85 लोकांना साक्षीदार म्हणून कोर्टात सादर करण्यात आलं.
17 जणांनी बचाव पक्षाच्या बाजूनं साक्ष दिल्या. सात महिन्यांपासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. अखेर आज नऊ महिन्यांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. निर्भायाच्या कुटुंबाकडून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
