नाटकाचे सेंसार कार्यालय आता पुण्यात

पुणे, – नाट्य संहितेच्या मान्यतेसाठी आता वारंवार मुंबईला हेलपाटे मारावे लागणार नाहीत, कारण अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेत रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाच्या केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे, मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे यांच्या हस्ते रविवारी टिळक स्मारक मंदिरातील नाट्य परिषदेच्या कार्यालयात या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष अविनाश देशमुख, कोषाध्यक्ष मेघराजराजे भोसले, मंडळाचे सदस्य सुनील महाजन याप्रसंगी उपस्थित होते. नाटकाच्या संहिता, एकपात्री कार्यक्रम, वाद्यवृंद, लावण्या, ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग अशा कार्यक्रमांसाठी मंडळाची मान्यता मिळणे गरजेचे असते. या मान्यतासाठी होतकरू आणि नवोदित कलाकारांना अनेक वेळा मुंबईला हेलपाटे मारावे लागतात, मात्र आता पुण्यात सोय उपलब्ध करून दिल्यामुळे नवोदित कलारांना ऊर्जा मिळणार आहे. या केंद्रात मंडळाच्या मान्यतेचे अर्ज, संकलित सर्व माहिती, तसेच कार्यवाहीची माहिती मिळू शकेल.

याविषयी सांगताना फ. मु. शिंदे म्हणाले, थेट कार्यालयाशी संपर्क करून फॉर्म मिळणे व नंतर मान्यता मिळणे वेळखाऊ काम आहे. सर्वच भागातील लोकांना ही अडचण जाणवते. पुणे शाखेने यासाठी पुढाकार घेतल्यामुळे कलाकारांची सोय होणार आहे. नवीन मुले छान लिखाण करतात. राज्यातील सर्व भागातून मोठ्या प्रमाणात लेखन येते त्यामुळे त्यांची सोय होऊ शकेल. नाट्य परिषदेच्या इतर शहरातील शाखांकडून प्रस्ताव आले तर त्या ठिकाणीही असे केंद्र सुरू करता येईल, वर्षभरात नाट्यसंहितेच्या मान्यतेसाठी साधारण 300 अर्ज येतात, तर इतर कार्यक्रमांचेही 500 ते 600ेे अर्ज मंडळाकडे येतात असे शिंदे यांनी सांगितले.