नवी दिल्ली – यासीन भटकळ याला गेल्या २७ तारखेला नेपाळ-भारत सीमेवर अटक करण्यात आल्यामुळे इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी चळवळीचा कणाच मोडला गेला आहे आणि गेल्या १५ दिवसात या संघटनेच्या हालचालींचा कानोसा घेतला असता त्या थंडावल्या असल्याचे लक्षात आले आहे. यासीन भटकळला अटक केल्यामुळे या कारवाया थंडावल्या आहेत की संघटनेचे नेते मोठ्या प्रमाणावर अटक झाल्यामुळे त्यांनी आपली रणनिती बदलायचे ठरवले आहे आणि त्यामुळे कारवाया थंडावल्या आहेत. याचा शोध घेतला जात आहे.
इंडियन मुजाहिदीनच्या शेवटाची सुरूवात
इंडियन मुजाहिदीन या संघटनेची स्थापना जिथून आणि ज्या पध्दतीने झाली तिचा वेध घेतला यासीन भटकळ हा या संघटनेसाठी बरेच काही होता. किंबहुना तो या संघटनेचा मुख्य संघटक आणि प्रेरक होता. असे लक्षात आले आहे आणि तोच आता तुरुंगात पडला असल्यामुळे या संघटनेच्या कारवाया आता गतिशील करणारा कोणीच बाहेर राहिलेला नाही आणि त्यामुुळे या संघटनेच्या पातळीवर सुनसान दिसत आहे.
एक एक अतिरेकी ताब्यात येत आहे आणि अटक झालेल्या अतिरेक्याकडून वरचेवर जी नवनवी माहिती हाती येत आहे तिच्या आधारे पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी आपल्या शोध कामांना गती दिली आहे. आजवर पोलिसांना चकवण्यात वाकबगार असलेल्या या अतिरेक्यांना आता पोलिसांना फार हुलकावण्या देणे शक्य होणार नाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळे हतबुध्द होऊन ते शांत बसले आहेत. असे लक्षात येत आहे. आजपर्यंत यासीन भटकळ, असाउद्दीन अख्तार, डॅनीश अन्सारी, मोहम्मद अत्तम आलम, इम्रान खान, सय्यद मकबुल, कातील सिद्दीकी, फसीम मोहम्मद, शहजाद अहमद, अतीर अमीन आणि मोहम्मद साजीद हे अतिरेकी सापडले आहेत.
मात्र अजूनही रियाज भटकळ, इक्बाल भटकळ हे बंधू अमीर रजा खान, तहसीम अख्तर, फैय्याज कागझील, शेहनवाज आलम इत्यादी ११ वॉन्टेडच्या लिस्टवरचे अतिरेकी सापडलेले नाहीत.
