मुझफ्फर नगर दंगलीत ९ जण ठार

लखनौ – उत्तर प्रदेशातल्या एका पश्‍चिम भागात मुझफ्फर नगर आणि शामली या दोन जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जातीय दंगलींमध्ये दोघा फोटोग्राफरसह ९ जणांची हत्या झाली असून ३४ लोक जखमी आहेत. या दंगलीमध्ये दोन जमातीचे लोक हातात शस्त्रे घेऊन भर रस्त्यात एकमेकांवर हल्ले करीत आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून उत्तर प्रदेश राज्य सरकारने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कराला पाचारण केले आहे.

२७ ऑगस्ट रोजी मुलीला छेडल्याच्या प्रकरणातून झालेल्या एका हत्येमुळे या दंगली सुरू झाल्या आहेत. शामली येथेही एका स्वच्छता कर्मचार्‍याने एका नागरिकाच्या घरासमोर कचर्‍याची गाडी उभी करण्यावरून भांडण झाले आणि या भांडणातून त्या स्वच्छता कर्मचार्‍याने त्या नागरिकाची हत्या केली. या दोन घटनांमुळे आणि एका व्यक्तीची एका विशिष्ट जातीच्या लोकांकडून दगडाने ठेचून हत्या केली जात असल्याचे व्हिडिओ क्लिपिंग वेगाने प्रसारीत झाल्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या जमावांनी शहरामध्ये जाळपोळ आणि लुटालूट यांचे एकच सत्र सुरू केले आहे.

मुझफ्फर नगरच्या कवाल गावामध्ये आपल्या बहिणीची छेडछाड करणार्‍या एका तरुणाला तिच्या दोघा भावांनी ठार केले. त्याचा बदला घेण्यासाठी त्या तरुणाच्या जाती बांधवांनी त्या दोघा भावांना ठेचून मारले. यामुळे त्यांच्या जातीमध्ये चीड निर्माण झाली आणि आपल्या जातीच्या लोकांच्या अशा हत्या होत असतील तर काय केले पाहिजे याचा विचार करण्यासाठी जात पंचायत बोलावण्यात आली. नेमके याच दिवशी कोणतरी कोणाला ठेचून मारत असल्याचे मोबाईल क्लिपिंग प्रसारित झाले आणि त्यामुळे जात पंचायतीला जमलेला जमाव चिडला. त्यातून हा सारा प्रकार घडला. या लुटालुटीत आणि जाळपोळीमध्ये शनिवारी सहा लोक मारले गेले त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आणि दंगलीच्या घटना शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पसरल्या.